Wednesday 13 July 2016

हजारो धारांचा प्रवाह 'सहस्त्रधारा'

आपल्या मायबोली मराठी मातीच्या महाराष्ट्रातून उत्तराखण्डला येऊन मला आता जवळपास एक महिना होईल आहे. कोणत्याही ठिकाणी गेल्यावर त्या परिसरातील, आजूबाजूला असलेली प्रेक्षणीय स्थळे बघावी, त्यांना भेट द्यावी, एक सुंदर असा प्रवास करावा, आणि शेवटी शक्य होईल तितका निसर्गाचा आस्वाद घ्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मीही हीच ईच्छा घेऊन इथे आलेलोय. मात्र बदलत्या वातावरणामुळे व भौगोलिक परिस्थितीच्या बदलामुळे माझा आतापर्यंतचा  वेळ स्वतःला इथल्या वातावरणात ऍडजस्ट करण्यातच गेला.
आठवडी सुट्टीचा दिवस म्हणजे 'रविवार'. इतके दिवस लोटल्यांनंतर शेवटी विचार केला चला आता उत्तराखण्ड राज्याला अजून जवळून न्याहाळूया, पर्यटनासाठी खास प्रसिद्ध असलेल्या आणि देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा राज्याला कोण भेट देऊ इच्छिणार नाही? शेवटी हा रविवार आपल्या कामी आणूनच घ्यावा, कुठेतरी फिरायला जावंच हा निर्धार मी केला. तसं कुठेही फिरायला जायचं म्हटलं तर सोबत मित्र हवेत, फिरायला कुणीतरी हवं कारण सर्व सोबत फिरण्याची मजा व त्यातील आनंद काही वेगळाच असतो. मात्र सध्या जागा नवीन आणि लोकही नवीन असल्याने मित्र म्हणून कुणाला सोबत घेऊन जावं असं कुणी लाभलं नाही आणि मित्र बनवायला तसा वेळही मिळाला नाही. असो, शेवटी फिरायला गेल्यावर तिथे नवे संपर्क साधणे, नवी ओळख होणे आणि त्यातच मग निसर्गाचा आनंद लुटणे ह्या गोष्टी मला आधीपासूनच खूप चांगल्या जमतात.  शेवटी  हा रविवार कुठेतरी फिरण्यास घालवावाच, एकटेपणाला विसरून सृष्टीत एक व्हावं या उद्देशाने मी प्रवास सुरु केला.

पहिला प्रवास-रुडकी ते देहराडून
सुरवातीला रूम वरून निघताना कुठे जायचं हे मी ठरवलेलं नव्हतंच, कुणीतरी सांगेलच, भेटेलच या विचाराने सर्वात आधी देहराडून जायचं ठरवलंच. सकाळी १०च्या सुमारास रूडकीवरून देहराडून बस पकडावी यासाठी वाट बघणे सुरु झालं. अचानक धो-धो पाऊस आला, आणि बसला यायला अर्धाएक तास  उशिरही झाला. सुरवातीला अचानक पडलेल्या या पावसामुळे थोडं घाबरलोच मात्र त्यानंतर वातावरण उघडलं, सर्व थंड आणि स्वच्छ वाटू लागलं, बस आली आणि रुडकी ते देहराडून हा ७३ किमीचा प्रवास सुरु झाला. तसं कुणालाही जायचं असेल तर सरळ देहराडून साठी ट्रेनही आहे मात्र त्यांचं वेळ आणि पावसामुळे इथलं वेळापत्रक तितकं काही विश्वासाचं नसतं.
आता कुठे खरा उत्तराखंड राज्यातला प्रवास सुरु झाला होता. इथे प्रवास करताना एक गोष्टी प्रखरपणे अनुभवायला मिळावी कि इथे जेव्हा पाऊस पडतो तो खूप भयानक पडतो, पाऊस आणि वाहतूक ठप्प यांचे समीकरण निश्चित असते. काहीएक ठिकाणे मागे गेली आणि आता बसचा उत्तराखंड मधील टेकड्या आणि पर्वतरांगांमधून खरा प्रवास सुरु झाला.
बघताच क्षणी नजर टक लावून एकसारखी बघत राहावी अशी नयनरम्य सृष्टी, नुकताच पाऊस येऊन गेला होता आणि पाण्याने गार झालेली वनराई आल्हाद निर्माण करत सुखावत होती. बस आता एक बाजूला टेकडी, दुसऱ्या बाजूला दरी अशा ठिकाणावरून चालत सुटली होती, असंख्य झाडे झुडुपांनी सजलेली टेकड्यांची रांग हिरव्या निसर्गाचा पुरावा देत होती. नागमोड्या वळण मी याआधीही बघितल्या होत्या पण त्या काहीएक अंतरसाठीच मात्र इथे असंख्य नागमोड्या वळणा त्याही ९०° च्या कोनाहूनही लहान अंशाने वळण घेणाऱ्या होत्या. वाटेत रुंद- अरुंद रोड येत होते. समोर काही अंतरावर तर फक्त एकेरी वाहतूक होईल असेही रस्ते बघायला मिळाले. ह्या प्रवासात हे सर्व बघताना मन एकदम उत्साहित झाले होते मात्र मधातच असं वाटू लागायचं कि इतक्या भर पावसाळ्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस एवढ्या उंच उंच डोंगरकपारीतून इतका लांबचा प्रवास कसा काय पूर्ण करत असतील? असो शेवटी ते शक्य होते, थोडा वेळ लागत असला तरी. मला वाटलं होतं त्याप्रमाणे अचानकच रस्त्यात अडथळे आल्याने दीड तासांचा प्रवास अडीच तासांवर गेला आणि शेवटी मी 'आयएसबीटी' या देहरादूनच्या बसस्थानकावर पोहचलो. सर्व वेगळं बघत असताना शेवटी कुठेतरी शहरात पोहचलोय याचा सुस्कारा मी घेतला. छान वाटलं. आता पुढे काय, याचा विचार आला.

आयएसबीटी- देहरादून-सहस्त्रधारा
आजचा सर्वांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे इंटरनेट, मीही त्याचा उपयोग करून घेतला. उत्तराखंड राज्यातील प्रेक्षणीय स्थळ शोधत असताना पहिलाच पर्याय मी निवडला तो म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांचा एक भाग असलेला 'सहस्त्रधारा'. शेवटी निर्धार केला आणि जायचं ठरवलं. आयएसबीटीच्या चौकातच महानगर बससेवेच्या बस चालतात. इथे सिटी बसेस ओळखायच्या म्हणजे त्यांचा रंग निळा असतो, आणि आकाराने लहान, व पुणे, नागपूर, मुंबई इथल्या सिटी बसला असलेल्या विशिष्ठ प्रकारच्या नावसारखं तिथे त्यांना नाव नाही. ह्या बसेस महानगर बसेस म्हणूनच ओळखल्या जातात. इथून सरळ बस पकडून मी मुख्य देहराडून शहराला पोहचलो. खुपदा बस च्या थांबण्याचं ठिकाण 'घण्टाघर' म्हणून प्रसिद्ध आहे. तिथून सहस्त्रधारासाठी खास बस असतात. तोच पर्याय मी निवडला आणि शेवटी एक तासाच्या प्रवासानंतर मी माझ्या ठरवलेल्या ठिकाणी पोहचलो.

एक अभूतपूर्व भेट 'सहस्त्रधारा'
ठिकाणावर पोहचण्याच्या आधीच बसमधून दिसणाऱ्या उंच उंच टेकड्या, हिरवीगार झाडे, खोलवर दरी सारखा भाग आणि दोन उंच टेकड्यांच्या मधात तयार होणारे पाण्याचे ढग आधीच नजर आपल्याकडे खेचून घेतात. अवघ्या ५००मी. अंतराचा पायी प्रवास करून मी  शेवटी 'सहस्त्रधारा' प्रवेशाच्या ठिकाणी पोहचलो आणि पोहचताच क्षणी अवाक होऊन राहिलो. आश्चर्यकारक असे नवलाईचे दृश्य, विहंगम असे वातावरण, गार गार असा वारा आणि दूरवर उंचच उंच अशा पर्वतरांगा आणि त्यांच्या कळसावरून नजरेस पडणारे धुक्यागत वाटेल असे निर्मित होणारे पाण्याचे ढग. हे सारे दृश्य नजरेला सुखावत होते, मनात एक आल्हाद निर्माण करत होते. आजपर्यंत आकाशात ढग वाहताना किंवा चालताना दिसतात अशी भ्रामंतीकाच मला वाटत असे मात्र आता प्रत्यक्ष तयार होणारे हे ढग मी पाहिले होते.
आता हळूहळू मी समोरचा प्रवास सुरु केला होता आणि तसे तसे निसर्गाचे सौंदर्य अजूनच बहरत चालले होते व देखावे अजूनच सुंदर वाटत होते.
हे स्थळ दोन्हीबाजूला विभाजलेले आहे व दोन्ही बाजूला दूरवर पसरलेल्या डोंगररांगा आहेत व त्यातून तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही किंवा मोजुही शकणार नाही अशा हजारो जागेतून लहान-मोठ्या धारा पायथ्यापर्यंत खाली वाहत येत आहेत. त्या सर्व धारा एकेजागी वेगळवेगळ्या ठिकानांवरून येऊन एक होतात आणि एक  प्रवाह निर्माण होतो जो वर्षभर सतत चालू असतो. त्याला थांबवता येत नाही व ते वाहणारे पाणी हे वेगवेगळ्या गुणधर्माने बनलेले व मिश्रित असलेलं आहे. आणि हाच प्रवाह ह्या ठिकाणाला दोन भागांत विभाजतो. म्हणून या पर्यटनस्थळाचं (हिलस्टेशन म्हणूनही) नाव 'सहस्त्रधारा' अस पडलेलं आहे. या जागेला ऐतिहासिक असा दर्जा मिळालेला आहे तो इथे प्राचीन काळापासून असलेल्या शिव मंदिर, लेणी आणि द्रोण गुहांमुळे. सुरवातीलाच हे शिव मंदिर आणि द्रोण गुहा आपल्याला डाव्या बाजूला असलेल्या प्रवेश द्वाराजवळ बघायला मिळतील. या मंदिरात दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरु करण्यासाठी सरळ रस्ता आहे.
इथे अजून मुख्यत्वाने नमूद करण्यासारखे असे कि या मंदिर आणि गुहांवर डोंगरकपार आणि त्यावर असलेल्या हिरव्यागार झाडांचं आच्छादन आहे. सुरवातीला हे बघताना थोडं भीतीदायक असं वाटतं मात्र नंतर तसं काही वाटत नाही. मंदिरांच्या मागच्या बाजूला प्राचीन द्रोण गुहा आहे जिथे प्राचीनकाळापासून नागमूर्ती ठेवलेली आहे. हिमालयाच्या या कुशीत वसलेल्या स्थळाला असलेली अशी प्राचीन वैशिष्ट्ये पूर्वकाळातील योगी आणि तपस्वी मुनींच्या कार्याची देण असावी असं इथे आल्यावर माहितीतून कळतं. इथून अजून पुढचा प्रवास सुरु होतो तो खऱ्या "सहस्त्र धारा' बघण्याचा. इथून पर्यटक लोकांची गर्दी वाढलेली दिसते. हळूहळू पायरी चढल्यासारखं मी वर चढतो आहे कॅमेऱ्यातून एक फोटो घेतो आहे, खाली खोलवर अशा दृश्याला बघतो आहे आणि मध्यभागातून वाहणाऱ्या, खळखळ आवाज करणाऱ्या व निखळ पाण्यात दार्शनिक लोकांचे निसर्गाचे आस्वाद घेणे हे सारं नजरेनं टिपतो आहे. दर पाच ते दहा मीटर अंतरावर पायथ्याखाली, मध्यभागी व टेकड्यांच्या वरच्या टोकावरून  वाहणाऱ्या धारा तुम्हाला बघायला मिळतील.
त्यांनतर मीही काहीवेळ वाहत्या पाण्याचा आंनद घेतला. पुढे अजून चालत राहिलो. अचानकच मग वर बघितले कि अजून मन प्रसन्न होते. कारण नुकताच पाऊस थांबलेला, पुन्हा सूर्याचा प्रकाश येऊ लागलेला आणि त्यातच दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा आणि त्यातील हिरवी झाडे आता अजूनच टवटवीत व उल्हसित दिसत होती. एक नवं दृश्य उजाडलंय अस वाटत होतं आणि हे सर्व निसर्गाचे रूप कॅमेऱ्यात कैद करण्यास निसर्ग स्वतः मला थांबवू शकत नव्हते. सर्व क्षणांना मी शक्यतोवर टिपलं. वर चढलो, अखण्डपणे वरच्या टोकावरून पायथ्याशी वाहणाऱ्या धारा अनुभवल्या, त्यांचा प्रवाह बघितला, आणि निसर्गात मी न्हाहून गेलो.
अशा या निसर्गाच्या सौंदर्याला वर्णन करणे हीही एक वेगळीच आनंदाची बाब आहे. अखंडपणे वाहत येणाऱ्या ह्या हजारो धारा येतात तरी कुठून? तर 'सहस्रधारा' हा हिमालयाचा एक भाग आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांचा हा भाग असल्याने वर टोकावर सतत तयार होणारा बर्फ वितळत वितळत खाली येतो आणि वाहताना वेगवेगळ्या झाडांच्या, रोपट्यांच्या, पानांच्या संपर्कात येत जातो व स्वतःचे गुणधर्म बदलत शेवटी मोठ्या धारेत रूपांतरित होतो. अशी हि क्रिया सतत सुरु असते. सर्वात मोहक मला वाटलेलं दृश्य म्हणजे इथल्या हिमकपारींच्या मध्ये तयार होणारे ढग व त्यातून धुके पसरले कि काय असा मनोहर देखावा. इथे आल्यावर किंवा यासंबधी माहिती नेटवर शोधल्यावर तुम्हाला कळेल कि या सहस्त्रधारांमध्ये 'गंधक'धारा (सल्फरच्या) आहेत ज्या रोगमुक्ती साठी योग्य ठरतात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितल्यावर असं माहिती होतं कि या पाण्यामुळे त्वचेचे किंवा कोणतेही बाह्य रोग होण्याची शक्यता कमी असते. मुळात लोक यामुळेच इथे दूरवरून भेट द्यायला येत असावेत. इथली काही वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला उंचावर चढायचे असेल तर 'रोपवे' ची सुविधा आहे, अमुझमेंट पार्क्स आहेत, मुलाच्या मनोरंजनाचे साधनं आहेत, तुम्ही मित्रांसोबत विकेन्ड ला जाताय त्यासाठी उत्तम सोय आहे, दूरवरून प्रवास करून कुटुंबासोबत फिरायला जात असल्यास राहायला आणि खायला सोय आहे. जर आपल्या मित्र,प्रेयसी किंवा प्रियकरासोबत, इष्टमित्र यासोबत हॉलिडे म्हणून जाताय तर खायची आणि फिरायची सोय आहे. एकूण निसर्ग म्हणजे सर्व काही आणि त्यात मग हे सर्व फिरणे व त्यातला आनंद छानच.
अशातऱ्हेने एका बाजूने सुरु केलेला 'सहस्त्रधारा' चा प्रवास मी दुसऱ्या बाजूला येऊन संपवला हे शेवटी कळलंच नाही. मात्र आनंद आणि आठवणी या कायमच्या कोरल्या गेल्या.

शेवटी काही टीप:-
१. सहस्त्रधारा ला पोहचायचे असल्यास आधी महामंडळ बसने आयएसबीटी ला जा किंवा ट्रेनने देहरादून स्टेशन ला उतरा.
२. इथून तुम्ही अवघ्या १४ ते १५ किमी दूर सहस्त्रधारा ला पोहचण्यासाठी आईएसबीटी वरून सरळ महानगर बस पकडा आणि ठिकाणावर पोहचा.
३. दूरवरून आलेले असाल तर थोडा अंतराचा व ट्राफिकचा त्रास होईल, बाकी राहायला आणि खायला भरपूर सुविधा आहे.
४. या ठिकाणी जायचं असेल तर जुलै ऑगस्ट पर्यंत जाऊ सकता कारण त्यानंतर पावसामुळे पातळी वाढते व परिस्थिती गंभीर होते.
५. भौगोलिक परिस्थिती व पाऊसाच्या दिवसांमुळे वाहतुकीवर ट्राफिक, अचानक  ठप्प झालेले रोड यांमुळे थोडा वेळेसंबंधी त्रास होऊ शकता.
६. शेवटी 'सहस्त्रधारा' हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून एक उत्तम ठिकाण आहे, निसर्गात वेळ घालवण्याचा उत्तम पर्याय आहे.

✍ सागर बिसेन
@sbisensagar

#प्रवासवर्णन०१

Sunday 10 July 2016

"प्रवासवर्णनांच्या आधी! "

आपले मानवी आयुष्य जगताना या पृथ्वीतलावर असा कुणीच नसेल ज्याने आपल्या आयुष्यात कधी प्रवास केला नसावा किंवा पर्यटनाला गेला नसावा. माझ्या निरीक्षणानुसार प्रत्येकजण एकदातरी आपल्या उभ्या आयुष्यात प्रवास करतोच, प्रेक्षणीय स्थळाला भेट देतो मग तो प्रवास मोठा असो कि लहान किंवा ते स्थळ मोठे असो किंवा लहान, मात्र प्रवास अनुभवायला मिळतो.
मनात खुपदा विचार आला होता कि आधीच्या असलेल्या दोन ब्लॉग सोबत 'प्रवासवर्णनांचा' ब्लॉगही आपण सुरु करावा. मात्र ते वेळेअभावी म्हणा किंवा मग तितका त्या विषयावर मंथन केला नाही म्हणा कि काही, मात्र ते काही जमलं नाही. पण आज अजून एक नवीन स्थळाला भेट देण्याचा प्रसंग आला, नवा अनुभव मिळाला, प्रवास करण्यात आला आणि मग विचार झाला कि या अनुभवांना शब्दांत एक आठवण व इतरांसाठी माहिती म्हणून कायमच शब्दबंध करावं. शेवटी याच संकल्पनेतून हा ब्लॉग अखेर जन्मास आला. आता या ब्लॉगचा 'प्रवास'ही सुरु होईल आणि कुठपर्यंत तो चालतो हे बघुयात.मुळात अजूनतरी प्रवासवर्णनाला सुरवात झालेली नाहीये मात्र मनस्वी आनंद होतोय मला हे नवीन ब्लॉग जन्मास आलेलं बघताना.
ब्लॉगचा पहिला 'प्रवासवर्णन' लिहिण्याआधी मी इथे हा पार्श्वभूमीचा ब्लॉग लिहिणे  महत्वाचे समजतो. कारण आजचा अनुभव आणि येणारे पुढील प्रवास व त्याची वर्णने तर लिहिली जातीलच मात्र याला पूरक म्हणून भूतकाळातील वर्णनं किंवा प्रवास यांवर प्रकाश टाकणे गरजेचं आहे.
"जेव्हा मी माझ्या आईच्या पोटी जन्माला आलो तेव्हापासूनच माझा खरा प्रवास सुरु झाला, आणि तो प्रवास आयुष्य या नावाने आज मी पूर्ण करतो आहे. त्या माऊलीला आभार, बाबांना हृदयातून नमन ज्यांच्या आशीर्वादाने आणि परिश्रमाने मी आज जग बघतोय, नव्या वाट शोधतोय आणि त्यांच्यामुळे हेही लिहू शकण्यास सक्षम झालोय." वयाच्या १२व्या वर्षीपासूनच माझा घराबाहेरचा  खरा प्रवास सुरु झाला आणि आता तर त्या प्रवासातून मी दूरवर येऊन पोहचलोय याचा मला आनंद आहे. खरं सांगायचं तर इतर लोकं (तरीही माझ्यासारखे कित्येक अजून आहेत) जसं सुट्यांवर किंवा विशिष्ट वेळी बाहेर फिरायला जातात, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद अनुभवायचा म्हणून विकेन्ड ला जातात, खूप मोठ्यामोठ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात तसं आमचं नाहीये. मुळात मला कुणाला दोष द्यायचा नाहीये कारण तशी सवय आम्हाला आधीपासूनच लागली नाही म्हणून, मात्र आम्ही(मी आणि माझे घरचे) आजपर्यत कधी सुट्या म्हणून फिरायचं, असा अनुभव घेतलाच नाही. आणि मी किंवा आम्ही कधीच याविषयी विचार केला नाही किंवा खंतही वाटून घेतली नाही. शेवटी नाही, तर नाही!
माझ्या शाळेमुळे मी जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हापासून मलातरी खुपसे प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळाले, निसर्गाच्या सौंदर्याला अनुभवायला मिळालं. जिल्ह्यातील एक- दोन का होईना मात्र त्या स्थळांचा पर्यटन म्हणून प्रवास मला लाभला. या सर्वांना मी प्रवासवर्णन म्हणून रेखाटायचा खुपदा प्रयत्न केला व ते लिहिलही मात्र कागदावरच ते. पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेर निघताना तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं देवस्थान व काही निसर्गाचे देखावे अनुभवल्यांनंतर मी त्या प्रवासाला (आजही आठवते) शेवटी लिहिलंच. हा डिजिटल मीडिया तेव्हा जन्मास आला नव्हता म्हणून जे लिहिलं ते कागदावरच राहिलं, मी आपल्या घरच्यांना पाठवून दिलं. छान वाटतंय हे आज सर्व आठवून. त्यानंतर अनुभव येत गेले आणि प्रवास होत गेला.
माझ्या कर्तृत्वाचे फळ म्हणून कि काय किंवा भाग्य म्हणून यावर्षी माझ्या प्रवासाला उधाण आले. पुणे (असं दुसर्यांदा, फिरायला म्हणून पहिल्यांदा) आणि मुंबई या शहरांना कधीतरी भेट द्यावी अशी मनात ईच्छा असताना हि शहरे एकाच वर्षात मला बघायला, फिरायला मिळाली. जणू आपण आपल्या महाराष्ट्राला अजून जवळून अनुभवायला सुरुवात केलीये असं भासू लागलं आणि खरंच आता केलीये. तरीही फार प्रवास अजून बाकी आहे. मात्र ह्या सर्व गोष्टी घडल्यांनातर माझ्याकडे वेळ किंवा मनात तशी तयारी नव्हती कि काय ते क्षण मी प्रवासवर्णन म्हणून लिहू शकलो नाही. फोटोज आणि काहीएक माहिती यांवरून मला सर्व अजूनही आठवते. जमल्यास त्या आठवणींनाही मी उजाळा देण्याचा प्रयत्न करेनच. एकटाच का होईना मी कुठेही जमलं तर फिरण्याचा आणि निसर्गाच्या सहवासात जगायचा प्रयत्न करतो, तो प्रवास जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आजतर मी प्रत्यक्ष राज्याबाहेरच्या ठिकाणी फिरायला गेलो, आणि तेही एकटचं, त्यातून नवा अनुभव आला, आनंद मिळाला, एक लांब प्रवास मी संपवून पूर्ण केला. त्याच सर्व आनंदातून शेवटी एक अनुभव, इतरांना पर्यटन म्हणून मदत व प्रेक्षणीय स्थळाला दिलेली भेट हि कायमची एक आठवण म्हणून जोपासावी हा निर्णय घेतला आणि शेवटी हा ब्लॉग जन्मास आला.
हा!हा! आता पार्श्वभूमीवरच लिहिताना मी इतका गुंतलोय कि मला पूर्ण भूतकाळातले प्रवास आठवू लागलेत. शेवटी आज झालेला अप्रतिम असा 'सहस्त्रधारा' व 'डेहराडून'चा प्रवास, पर्यटन म्हणून स्थळाला दिलेली भेट याचा वृतांत उद्या नव्याने पहिला 'प्रवासवर्णन' म्हणून तुमच्यासाठी तयार असेलच, तोपर्यंत मित्रहो तुम्ही सुरु ठेवा तुमचा वाचनाचा 'प्रवास'. थकलोय खूप, मात्र उत्साह आणि आनंद कायम आहे!!

© सागर बिसेन
@sbisensagar