आपले मानवी आयुष्य जगताना या पृथ्वीतलावर असा कुणीच नसेल ज्याने आपल्या आयुष्यात कधी प्रवास केला नसावा किंवा पर्यटनाला गेला नसावा. माझ्या निरीक्षणानुसार प्रत्येकजण एकदातरी आपल्या उभ्या आयुष्यात प्रवास करतोच, प्रेक्षणीय स्थळाला भेट देतो मग तो प्रवास मोठा असो कि लहान किंवा ते स्थळ मोठे असो किंवा लहान, मात्र प्रवास अनुभवायला मिळतो.
मनात खुपदा विचार आला होता कि आधीच्या असलेल्या दोन ब्लॉग सोबत 'प्रवासवर्णनांचा' ब्लॉगही आपण सुरु करावा. मात्र ते वेळेअभावी म्हणा किंवा मग तितका त्या विषयावर मंथन केला नाही म्हणा कि काही, मात्र ते काही जमलं नाही. पण आज अजून एक नवीन स्थळाला भेट देण्याचा प्रसंग आला, नवा अनुभव मिळाला, प्रवास करण्यात आला आणि मग विचार झाला कि या अनुभवांना शब्दांत एक आठवण व इतरांसाठी माहिती म्हणून कायमच शब्दबंध करावं. शेवटी याच संकल्पनेतून हा ब्लॉग अखेर जन्मास आला. आता या ब्लॉगचा 'प्रवास'ही सुरु होईल आणि कुठपर्यंत तो चालतो हे बघुयात.मुळात अजूनतरी प्रवासवर्णनाला सुरवात झालेली नाहीये मात्र मनस्वी आनंद होतोय मला हे नवीन ब्लॉग जन्मास आलेलं बघताना.
ब्लॉगचा पहिला 'प्रवासवर्णन' लिहिण्याआधी मी इथे हा पार्श्वभूमीचा ब्लॉग लिहिणे महत्वाचे समजतो. कारण आजचा अनुभव आणि येणारे पुढील प्रवास व त्याची वर्णने तर लिहिली जातीलच मात्र याला पूरक म्हणून भूतकाळातील वर्णनं किंवा प्रवास यांवर प्रकाश टाकणे गरजेचं आहे.
"जेव्हा मी माझ्या आईच्या पोटी जन्माला आलो तेव्हापासूनच माझा खरा प्रवास सुरु झाला, आणि तो प्रवास आयुष्य या नावाने आज मी पूर्ण करतो आहे. त्या माऊलीला आभार, बाबांना हृदयातून नमन ज्यांच्या आशीर्वादाने आणि परिश्रमाने मी आज जग बघतोय, नव्या वाट शोधतोय आणि त्यांच्यामुळे हेही लिहू शकण्यास सक्षम झालोय." वयाच्या १२व्या वर्षीपासूनच माझा घराबाहेरचा खरा प्रवास सुरु झाला आणि आता तर त्या प्रवासातून मी दूरवर येऊन पोहचलोय याचा मला आनंद आहे. खरं सांगायचं तर इतर लोकं (तरीही माझ्यासारखे कित्येक अजून आहेत) जसं सुट्यांवर किंवा विशिष्ट वेळी बाहेर फिरायला जातात, निसर्गाच्या सानिध्याचा आनंद अनुभवायचा म्हणून विकेन्ड ला जातात, खूप मोठ्यामोठ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात तसं आमचं नाहीये. मुळात मला कुणाला दोष द्यायचा नाहीये कारण तशी सवय आम्हाला आधीपासूनच लागली नाही म्हणून, मात्र आम्ही(मी आणि माझे घरचे) आजपर्यत कधी सुट्या म्हणून फिरायचं, असा अनुभव घेतलाच नाही. आणि मी किंवा आम्ही कधीच याविषयी विचार केला नाही किंवा खंतही वाटून घेतली नाही. शेवटी नाही, तर नाही!
माझ्या शाळेमुळे मी जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हापासून मलातरी खुपसे प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळाले, निसर्गाच्या सौंदर्याला अनुभवायला मिळालं. जिल्ह्यातील एक- दोन का होईना मात्र त्या स्थळांचा पर्यटन म्हणून प्रवास मला लाभला. या सर्वांना मी प्रवासवर्णन म्हणून रेखाटायचा खुपदा प्रयत्न केला व ते लिहिलही मात्र कागदावरच ते. पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेर निघताना तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं देवस्थान व काही निसर्गाचे देखावे अनुभवल्यांनंतर मी त्या प्रवासाला (आजही आठवते) शेवटी लिहिलंच. हा डिजिटल मीडिया तेव्हा जन्मास आला नव्हता म्हणून जे लिहिलं ते कागदावरच राहिलं, मी आपल्या घरच्यांना पाठवून दिलं. छान वाटतंय हे आज सर्व आठवून. त्यानंतर अनुभव येत गेले आणि प्रवास होत गेला.
माझ्या कर्तृत्वाचे फळ म्हणून कि काय किंवा भाग्य म्हणून यावर्षी माझ्या प्रवासाला उधाण आले. पुणे (असं दुसर्यांदा, फिरायला म्हणून पहिल्यांदा) आणि मुंबई या शहरांना कधीतरी भेट द्यावी अशी मनात ईच्छा असताना हि शहरे एकाच वर्षात मला बघायला, फिरायला मिळाली. जणू आपण आपल्या महाराष्ट्राला अजून जवळून अनुभवायला सुरुवात केलीये असं भासू लागलं आणि खरंच आता केलीये. तरीही फार प्रवास अजून बाकी आहे. मात्र ह्या सर्व गोष्टी घडल्यांनातर माझ्याकडे वेळ किंवा मनात तशी तयारी नव्हती कि काय ते क्षण मी प्रवासवर्णन म्हणून लिहू शकलो नाही. फोटोज आणि काहीएक माहिती यांवरून मला सर्व अजूनही आठवते. जमल्यास त्या आठवणींनाही मी उजाळा देण्याचा प्रयत्न करेनच. एकटाच का होईना मी कुठेही जमलं तर फिरण्याचा आणि निसर्गाच्या सहवासात जगायचा प्रयत्न करतो, तो प्रवास जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आजतर मी प्रत्यक्ष राज्याबाहेरच्या ठिकाणी फिरायला गेलो, आणि तेही एकटचं, त्यातून नवा अनुभव आला, आनंद मिळाला, एक लांब प्रवास मी संपवून पूर्ण केला. त्याच सर्व आनंदातून शेवटी एक अनुभव, इतरांना पर्यटन म्हणून मदत व प्रेक्षणीय स्थळाला दिलेली भेट हि कायमची एक आठवण म्हणून जोपासावी हा निर्णय घेतला आणि शेवटी हा ब्लॉग जन्मास आला.
हा!हा! आता पार्श्वभूमीवरच लिहिताना मी इतका गुंतलोय कि मला पूर्ण भूतकाळातले प्रवास आठवू लागलेत. शेवटी आज झालेला अप्रतिम असा 'सहस्त्रधारा' व 'डेहराडून'चा प्रवास, पर्यटन म्हणून स्थळाला दिलेली भेट याचा वृतांत उद्या नव्याने पहिला 'प्रवासवर्णन' म्हणून तुमच्यासाठी तयार असेलच, तोपर्यंत मित्रहो तुम्ही सुरु ठेवा तुमचा वाचनाचा 'प्रवास'. थकलोय खूप, मात्र उत्साह आणि आनंद कायम आहे!!
© सागर बिसेन
@sbisensagar
वाह छान आपले प्रवास वर्णन
ReplyDeleteवाह छान आपले प्रवास वर्णन
ReplyDeleteखूप खूप आभार साहेब!!😊
Delete😊👌.... Mala shabd nahi yet varnan karnyasathi ...tuza pravas asach chalu thev ..all d best (Endless journy)
ReplyDeleteThank you so much Vaibhav!!😊
DeleteThank you so much Vaibhav!!😊
Delete